‘माज्या बाळांनु, तुमी समदं ह्ये समजून घ्यावा, की हितं पक्क्या घरात -हातुया म्हून कोनीबी अमर व्हनार न्हाई हाये. हितं ह्या रस्त्यांवर मोटरी, टरक, फटफट्या, टेम्पा, ह्या समद्यांखाली सापडून जेवडी मानसं मरत्यात, त्यवड्यांना तितं स्हावजानं, बिबट्यानं का साप विंचवांनी मारलं असं कदी आयकलं न्हाई.’ आईमाचं बोलणं ऐकल्याबरोबर मी खोल विचारात पडलो. ह्या रमणीय पृथ्वीवर जीवन तर सगळीकडे फुललेलं-फळलेलं आहे, आणि जिथं म्हणून जीवन आलं, तिथं अनिश्चितता आलीच. इथं शहरात भीती वाटेल अशी अनिश्चितता. तिकडं गीरच्या जंगलात, नैसर्गिक वातावरणात असणारी अनिश्चितता रम्य, सुंदर! पुढे काही विचार मनात येण्यापूर्वीच आईमांचा आवाज खोलीभर पुन्हा गुंजला. ‘समदे सिकलेले लोक दररोज पेपरात वाचून आमाला सांगत्यात, तं उगाच उगाच भांडनं करून आनि लडाया करून मानसं कुटं न्हाई मरत? आनि तरीबी प्रिथिवीला ‘खमा’ म्हनायला पन हितं येळ हाये कोनाला?’ सरळ शांत वाहात जाणारी हीरण नदी एकाएकी काळ्या खडकांचा किनारा ओलांडून बाहेर यावी, तसं माझं मन उचंबळून आलं. गीरमध्ये आलो त्या पहिल्या संध्याकाळी आईमांच्या तोंडून ऐकलेल्या ‘खमा’चे अनेक अर्थ आज, अचानक अशा तNहेनं, फुलून-पांघरून माझ्या लक्षात येतील ह्याची मला कल्पनाही नव्हती.... एका चित्रकाराच्या आत्मशोधाची – त्याला सापडलेल्या ‘गीर’ची बहुपेडी व विलक्षण कादंबरी!