Ambarnath Shivalay by Dr. Kumud Kanitkar
Ambarnath Shivalay by Dr. Kumud Kanitkar
Ambarnath Shivalay by Dr. Kumud Kanitkar
अंबरनाथ गावात शिरल्यावर 'पुरातन शिवमंदिराकडे' अशा पाट्या रस्त्यांवर दिसतात. मान्न तिथवर पोचल्यानंतरसुद्धा हे शिवालय आपल्याला भूतकाळात किती मागे नेऊन पोचवते याचा अंदाज येत नाही, म्हणून हा पुस्तकाचा खटाटोप. शिलाहार राजवंशाच्या राजांनी बांधलेले हे मंदिर इ.स. १०६० मध्ये पूर्ण झाले. शिलाहारांच्या तीन शाखांपैकी कोकण शाखेची राजधानी 'भीस्थानक', म्हणजेच आजचे ठाणे येथे होती. कोकण शिलाहारांचा सर्वांत जुना, इ.स. ८४३ मधला शिलालेख, कान्हेरी बौद्ध गुंफांमधे आहे. कोण्या 'गौऽदेशीय' (बंगाली) गोमिन् अविघ्नाकरने तिथे राहणाऱ्या भिंच्या करिता १०० 'द्रम्म' देणगीची नोंद करणारा हा लेख. शिलाहार राजांचा फक्त उल्लेख, तरीही इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा. अंबरनाथ मंदिराच्या आधी 'लवणेतट' (आजचे लोणाड) येथे सूर्य मंदिर होते (इ.स.१००८ चा लेख). त्यांच्या राज्यातील एक अग्रहार 'दीपकग्राम' (दिवेआगर) मधील लेखात एका बागेतील नारळ, फणस, चाफा, आंबा ह्या झाडांवरचा कर माफ केल्याची नोंद आहे. मंदिराच्या रूपाने साक्षात इतिहास आपल्यासमोर उभा राहतो. जणू डोळे मिटले तर शैवसैद्धांतिक आचार्यांचा मंत्रघोष देखील आपल्या कानांना ऐकू यावा !
अत्युत्तम शिल्पे, अनवट स्थापत्य शैली, शैव सिद्धांत तत्त्वज्ञानानुसार मूर्तिरचना आणि स्पष्ट कालोल्लेख यामुळे या मंदिरास अनन्यसाधारण महत्त्व आहे. इ.स. १८६८ मधे ब्रिटिश सरकारने सर्वेक्षणासाठी निवडलेल्या हिंदुस्तानातील चार वास्तूंपैकी पश्चिम भागाचे प्रतिनिधित्व करण्याचा मानही या मंदिराचा आहे. आपल्या प्रांताच्या गतवैभवाची मूक साक्ष देत हजार वर्षे उभ्या असलेल्या या मंदिराची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे.