नायजेरियाच्या उत्तर भागातील लेखकांनी इंग्रजीत लिहिलेल्या कादंब-यांची संख्या अत्यल्पच आहे, त्यामुळे अशा प्रकारची एखादी कादंबरी प्रकाशित होणे म्हणजे साहित्यिक विश्वातली एक महत्त्वाची घटनाच ठरते. कथानायिका आणि तिच्या साथीदारांनी नायजेरियाच्या समाजव्यवस्थेतील महिलांच्या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या या नाट्यपूर्ण कथेतून - कथा-कादंबNयांतून अभावानेच आढळणारा राजकीय समस्यांचा आलेख - मुस्लीम महिलांचे कायद्याच्या दृष्टीने असलेले स्थान, परंपरांनी आणि धार्मिक रूढी, समजुतींनी त्यांच्यावर लादलेल्या मर्यादा, आर्थिक व्यवहाराच्या कामांमधील त्यांच्या सहभागावर असणारी बंधने, भ्रष्ट पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचे एकूणच समाजावर आणि विशेषत: स्त्रियांवर होणारे विघातक परिणाम, व्यक्तिगत आयुष्यातही पुरुषी ताकदीच्या बळावर महिलांना दिली जाणारी अत्यंत अपमानास्पद वागणूक- असा विस्तृत पट एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर उलगडतो. आत्मपरीक्षणातून बंधमुक्ती साधणा-या नायजेरियन स्त्रीची अत्यंत कल्पकतेने आणि कुशलतेने बांधलेली ही कथा आहे. ही कादंबरी निव्वळ सामाजिक दस्तऐवज न राहता वाचकाला त्यातील कथानायिकेच्या - अमिनाच्या सहवेदना भोगायला भाग पाडते. ‘अमिना’ ही एक अत्यंत सुयोग्य वेळी प्रकाशित झालेली कादंबरी आहे आणि हे कथानक इतक्या उत्तम रीतीने आपल्यासमोर आकार घेत जाते की त्याची तुलना ऐतिहासिक दंतकथांमधील १६व्या शतकातील झज्जाऊ येथील साहसी राणी हौसा आणि अमिना यांच्या आयुष्याशी केल्याशिवाय आपण राहात नाही. नायजेरियामध्ये बदल घडून येण्यास वाव आहे असा आशेचा किरण ही कादंबरी निश्चितच दाखवते.