क्रोध, लोभ, मद, मत्सर इत्यादी षडरिपुंमधे दशांगुळं मातब्बर ठरते कामवासना! अन्य वासनांचा अंत शक्य आहे पण कामवासना मात्र अंतहीन! कामोपभोग घेणं हीच पुरुषप्राण्याची आदिम, उन्मत्त लालसा. कामवासना ही जशी सर्जनशील तशी विनाशकारीसुद्धा! कधी प्रेमरज्जू बांधते तर कधी सूडभावना चेतवते. तिची अनंत रुपं थक्क करणारी! ती स्वत:च्या अनावर प्रपातात पुरुषाला आणि क्वचित स्त्रीलासुद्धा अध:पतित करीत पशुत्वाच्या क्रूर पातळीला नेऊन ठेवते. कामवासनेच्या नानाविध रुपांना बळी पडलेल्या, कामशरणागत झालेल्या पात्रांच्या या श्रुंगारकथा समाजाला ‘सेक्स`च्या प्रदूषणाचा गंभीर विचार करायला भाग पाडतील अशाच आहेत.