पावसाची सर आली. उंटाचे अंग भिजू लागले. निळू म्हणाला, ‘‘चला, पळा! ह्याला निवाऱ्याला ठेवला पाहिजे.’’ आम्हाला कुणाच्यातरी घरात उंटाला ठेवायचे होते, पण वाडीतील सगळी घरे बुटकी होती. माझ्या घरात उंट मावत नव्हता. निळूच्या घरात मावत नव्हता. देवळात मावत नव्हता. उंटाला कुठेच निवारा नव्हता. मेंढरांना, शेरडांना, कोंबड्यांना, कुत्र्यांना आडोसा होता. माणसांना आडोसा होता, पण उंटाला नव्हता. कारण तो सर्वांत जास्त मोठा, उंच होता. अचानक बाहेरून परका आलेला होता. पावसाची भुरभुर थांबली. संध्याकाळ झाली. मग एकाएकी उंटाने पुढच्या पायाचे गुडघे मोडले. त्याचा भलामोठा देह खाली आला. मान लांब करून त्याने भुईवर टाकली. उंटाने टक लावून आमच्याकडे बघितले आणि डोळे मिटले.