Faceless Facebook by Maruti Shirtode
Faceless Facebook by Maruti Shirtode
Couldn't load pickup availability
फेसलेस फेसबुक : हा विस्तीर्ण पोकळीतील कुशल माणसांचा सतेज चेहरा आहे. ज्या दोन हातांनी या विश्वनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं, त्या हातांचं निर्विवाद प्रतिनिधित्व आहे. लेखकाने शोधलेली माणसं केवळ काळजात कोलाहल करत नाहीत, तर आपलं स्वतंत्र घर करुन राहतात. ज्या माणसांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास काळाच्या ओघात नजरेआड होतो, नेमकी तीच माणसं लेखकाला दिसतात आणि लेखक आपल्यासमोर त्यांचं जग रेखाटतो. 'फेसलेस फेसबुक' मध्ये लिहलेली सगळी पात्रं आपल्या अवतीभोवती खोल रुजलेली आहेत. बन्याचदा ती माणसं आपल्या सगळ्यांची सावलीसुद्धा झालेली आहेत. पण आपल्याकडून ती दुर्लक्षिली गेली आहेत. त्या माणसांच्या सावलीची कृतज्ञता लेखकाने शब्दात व्यक्त केली आहे. मनोरंजनाचा विडा उचललेला सोंगाड्या बालम, जुन्या वस्तूंशी नातं जोडलेला संग्राहक भगवान, चळवळ जिवंत रहावी यासाठी अहोरात्र झगडून मेलेला राजाराम, माय भगिनींच्या सेवेला आयुष्य समर्पित केलेला अमोल, कुस्तीसाठी जगलेला आणि बैलांसाठी राबलेला मल्हारी अशी सगळी पात्रं डोक्यात झिणझिण्या आणून सोडतात. काळजाची तार छेडतात. या सगळ्या माणसांना समाजाने न्याय दिला का ? हा सवाल उभा करतात. या सगळ्यांच्या गोष्टी मांडताना लेखकाने केलेली शब्दफेकिची जादू नक्कीच भुरळ पाडते. त्यामुळे हि पात्रं आपलीशी होऊन जातात. जगण्याच्या खोल तळाशी जाऊन माणसांच्या भावभावनांचा शोध घेतात. गावाकडील माणसांच्या जगण्यातली अस्सलता आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वाची सर्जनशाळा म्हणजे 'फेसलेस फेसबुक' आहे. मला हे पुस्तक प्रचंड भावलंय. त्यामुळेच गेल्या काही वर्षातला 'व्यक्तिचित्रण' मांडणारा उत्तम लेखक म्हणून मी मारुती शिरतोडे यांच्याकडे पाहतो. - शरद तांदळे