समकालीन संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या अशा या पुस्तकात भारताचा प्रदीर्घ इतिहास, गुंतागुंतीचे वर्तमान आणि अनेक शक्यतांना जन्माला घालणारे भविष्य यांचा एक सुसंगत असा अन्वय लावण्याचा प्रयत्न नंदन निलेकणी यांनी केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातल्या समाजवादी धोरणांमागचे तत्कालीन उद्देश कितीही चांगले असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या धोरणांची परिणती लोकशाही खिळखिळी करणाNया कुचंबल्या वर्तमानात कशी आणि का झाली, याचे सखोल विवेचन निलेकणी यांनी केले आहे. वर्तमान आणि भविष्य यांचा खंबीर आधार म्हणून उदयाला आलेली भारतातील तरुण लोकसंख्येची दमदार शक्ती हा कळीचा मुद्दा का आहे; याचे विश्लेषण हा या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने होत जाणाNया क्रांतीमुळे केवळ व्यापार, उद्योग आणि सरकारी कारभारातच नव्हे; तर बहुसंख्य भारतीयांच्या आयुष्यात किती रोमांचक परिवर्तन घडते आहे; याचे अत्यंत रोचक वर्णन या पुस्तकात आहे. जातीच्या गणितांवर बेतलेले राजकारण, कामगार क्षेत्रात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या सुधारणा, पायाभूत सुविधांची उभारणी, उच्च शिक्षणाचे क्षेत्र आणि भारतातला इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव यांसारख्या कळीच्या वादग्रस्त मुद्द्यांचे नंदन निलेकणी यांनी विस्ताराने आणि संपूर्णत: नव्या दृष्टिकोनांसह विस्तृत विवेचन केले आहे.