Joo - Aishvary Patekar
Joo - Aishvary Patekar
आत्मबळाचा साक्षात्कार घडवणारी श्रमदेवता
' जू' हे युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांचं आत्मकथन बहुसंख्य वाचकांनी डोक्यावर घेतलं आहे. सुखाची जराशीही हिरवळ शोधूनही सापडणार नाही असं जगणं लेखकाच्या व त्याच्या आई आणि चौघी बहिणींच्या वाट्याला आलं. परिस्थितीनं या सगळ्यांवर लादलेलं दुःखव्याप्त जगणं यासाठी 'जू' हा शब्द प्रतिकात्मक रीतीनं वापरलेला आहे. 'मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारं हे आत्मकथन आहे,' असं डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी प्रस्तावनेत नमूद केलं आहे.
' चार गावच्या बारवा अन् मी मधी जोंधळा हिरवा,' 'नवी बाहुली,' 'लेकुरवाळं आभाळ अन् ठिपक्याएवढा बाप,' 'भर उन्हाळ्यात हिरव्या हिरव्या फांद्या,' 'मायलेकींची दिंडी,' 'मोडलेल्या घराची उशी अन् भुईचं अंथरून' यांसारख्या शीर्षकांमुळे या आत्मकथनाच्या प्रकरणांबद्दलचं कुतूहल जागं होतं. ज्येष्ठ ग्रामीण लेखक प्राचार्य डॉ. रा. रं. बोराडे यांनी या लेखनाचं कौतुक करताना म्हटलं आहे,' वयाच्या पंधरा- सोळा वर्षांपर्यंतच जगणे एवढ्या प्रदीर्घ स्वरूपात शब्दबद्ध करणारे, कदाचित मराठीतले हे पहिले आत्मकथन असावे. अनेक घटना- प्रसंगांनी उभे राहिलेले हे आत्मकथन वाचकाला चक्रावून टाकते, हे मात्र निर्विवाद!'