Kavivarya Narayan Surve Mastranche Vidhyapith By: Udhav Kanade / Purushottam Sadaphule
Kavivarya Narayan Surve Mastranche Vidhyapith By: Udhav Kanade / Purushottam Sadaphule
Couldn't load pickup availability
श्री. नारायण सुर्वे हे कामगार जीवनाशी समरस झालेले आणि ते जीवन प्रत्यक्षात अनुभवणारे कवी आहेत. आजवरचे आमचे साहित्य बव्हंशी पांढरपेशा वर्गातील लेखकांनी निर्माण केलेले आहे. श्री. सुर्वे यांची कविता लढाऊ वृत्तीची. समाजक्रांतीची उपासना करणारी नव्या आनंदवनभुवनाचे मनोहर स्वप्न पहाणारी आहे.
"कामगार आहे मी तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे"
कामगारांच्या जगात वाढलेला, त्यामधूनच स्फूर्ती घेतलेला आणि त्यांच्याच व्यथा-वेदना, आशा-आकांक्षा, राग-लोभ व्यक्त करणारा कवी हीच सुर्वे यांची ओळख ठरली. बकाल अंधारात जीवन जगणारे पण प्रकाशाकडे झेपावण्याची जिद्द बाळगणारे, प्रस्थापित नीतीमत्तेचे जोखड झुगारुन शाश्वत नीतिधर्म मानणारे सांस्कृतिक सरहद्दीवरचे जग नारायण सुर्वे यांच्या कवितेत प्रथम बोलायला लागले. हे सुर्वे यांच्या कवितेचे ऐतिहासिक महत्त्व आहे. सुर्वे यांच्या कवितेतील जग कामगारांचे, उपेक्षितांचे, हातावर पोट असणारांचे आहे. या जगात दैन्य आहे, दुःख आहे. पण ते असहाय्य नाही. सुर्वे यांचे मन सामाजिक क्रांतीच्या संकल्पनेशी बांधिलकी मानणारे आहे. शोषणग्रस्त माणूस हे सुर्वे यांच्या कवितेचे केंद्र आहे. कवीने जोपासलेल्या जीवनविषयक दृष्टीकोनामुळे उद्याविषयीचा अढळ विश्वास आहे. कोणत्याही शस्त्रापेक्षा प्रभावी ठरणारा हा विश्वास हेच या कवितेचे वैशिष्ट्य आहे व तेच मला मोलाचे वाटते.
Share
