विनोद ही आदिम प्रेरणा आहे.
मानवी जीवनात तिचे महत्त्व वादातीत आहे.
विनोदी साहित्य लिहिण्याची कला आणि प्रतिभा फारच कमी लोकांकडे असते. जी गोष्ट आपल्या सरळ नजरेला गंभीर वाटते, तीच गोष्ट जरा वेगळ्या किंवा तिरक्या नजरेने पाहिली की, विनोद निर्माण होतो. अशी वेगळी नजर ह. शि. खरात यांना आहे. अतिशय सभ्य आणि उच्च पातळीवरच्या सुसंस्कारित विनोदी लेखनाची किल्ली त्यांना सापडली आहे.
‘खसखशीचा मळा’ ह्या विनोदी कथासंग्रहातील पंधरा कथा वाचकांचे मनोरंजन तर करतीलच; पण आजच्या सुसंस्कृत समाजातल्या विसंगत जीवनाचे दर्शनही घडवतील. विनोदाला असलेला अल्पजीवित्वाचा शाप खरातांच्या कथांना नाही. हे केवळ विनोदी साहित्य नाही, तर अभिजात व अभिरुचिसंपन्न आहे.
ह्या कथा वाचक पुन:पुन्हा वाचतील, वाचकांना निर्मळ आनंद देतील. वेळप्रसंगी त्यांचे दु:खही विसरायला लावतील.
एवढे घडले तरी पुस्तक प्रपंचाचे श्रम कारणी लागले, असे म्हणता येईल.