Uchlya (उचल्या)
Uchlya (उचल्या)
‘उचल्या’मुळे जितके आनंदाचे दिवस पाहिले तेवढेच दु:खाचे दिवस पण मला पहावयास मिळाले. काही लोकांना माझ्या मोठेपणामुळे जेवढे चांगले वाटले तेवढेच काहींना वाईटसुद्धा वाटले.
‘उचल्या’मुळे विमुक्त भटक्या समाजाच्या समस्येला, त्यांच्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. ‘उचल्या’चे इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, तेलगू, उर्दू अशा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. माझे अनुवादित पुस्तक वाचून भारतातील लोकांना ‘डिनोटिफाइड ट्राइब्ज’ जमातीच्या व्यथा प्रथमच कळल्या. यामुळे भारतातल्या अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ही पुस्तके तर लागलीच; पण काहींनी तर ‘उचल्या’वर पीएच.डी. करून डॉक्टरेटही मिळविली.
‘उचल्या’मुळे विभिन्न भाषेमधील वेगवेगळ्या प्रांतातील हजारो वाचक आज माझ्यावर भरभरून प्रेम करत आहेत आणि मला देशभर विविध साहित्याच्या कार्यक्रमांसाठी बोलावले जाते.
‘उचल्या’ या पुस्तकामुळे भारतातल्या अनेक दिग्गज साहित्यिकांशी आणि नेत्यांशी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या गाठीभेटी झाल्या. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसाठी भारताच्या चार पंतप्रधानांशी बोलण्याची आणि भेटण्याची संधी मिळाली.