यश सगळ्यांनाच हवे असते, मग त्याला शालेय विद्यार्थी कसे अपवाद असतील? पण ते यश मिळवण्यासाठी भरपूर परिश्रम व वेळेचे व्यवस्थापन करण्याची, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची,
आपला पूर्ण वेळ योग्यप्रकारे वापरून फक्त ढोरमेहनत न करता जास्तीत जास्त परिणाम देण्याची किमया आपल्याला साधता यायला हवी. ही किमया कशी साधायची, तंत्रशुद्ध व ‘अवघड’ नव्हे तर ‘स्मार्ट’ पद्धतीने अभ्यास कसा करायचा, त्यासाठी नियोजन कसे करायचे, उजळणीची योग्य पद्धत काय? अभ्यासक्षमता कशी वाढवायची, याविषयी तर हे पुस्तक तुम्हाला शास्त्रोक्त मार्गदर्शन करतेच; परंतु पाल्याच्या अभ्यासाबाबत पालकांची काय भूमिका असायला हवी, परीक्षेत यश कसे मिळवावे, ताणावर मात कशी करावी, यशस्वी होण्याचे प्रभावी मंत्र कोणते याविषयीदेखील सोप्या, ओघवत्या भाषेत सखोल ज्ञान देते. आजच्या व्यस्त जीवनशैलीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन हे पुस्तक छोट्या टिप्सच्या स्वरूपात केले असले तरी नक्कीच मोठा परिणाम देणारे आहे. या पुस्तकाचे कोणतेही पान तुम्ही केव्हाही वाचू शकता, हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. घड्याळाशी बांधल्या गेलेल्या पाल्य व पालकांना कमीत कमी वेळेत फक्त गुण मिळवून देणारेच नव्हे तर गुणवत्तापूर्ण अभ्यास कसा करता येईल वा करवून घेता येईल व परीक्षेत व व्यक्तिगत आयुष्यातही हमखास यश कसे मिळवता येईल याचे मर्म सांगणारे प्रभावी पुस्तक.