श्रीमती उषाताई दराडे यांच्या सर्व लेखनाच्या केंद्रस्थानी प्रामुख्यानं स्त्री आहे. एका लेखातून एकेका स्त्रीची किंवा कधी अनेक स्त्रियांची ‘कहाणी’ उलगडत जाते. ही कहाणी प्रत्येक वेळी सुफळ संपूर्णच झालेली असते असेही नाही. स्त्रियांच्या आदिम वेदनेच्या कहाण्या परंपरेनं आपल्यापर्यंत झिरपत आल्या. बदललेल्या सामाजिक व्यवस्थेत स्त्रियांच्या प्रश्नांचं आणि संघर्षाचं स्वरूपही बदलत गेलं. त्यातून एक वेगळी ‘स्त्री’ उभी राहते आहे. या ‘स्त्री’चं जगणं,भोगणं वेगळ्या प्रकारचं आहे श्रीमती उषाताईंनी अतिशय संवेदनशीलतेनं स्त्रियांच्या जगण्यातील वास्तव टिपकागदासारखं टिपून आपल्यासमोर मांडलं आहे.