‘गुंजन’ भा. द. खेर यांचा कथासंग्रह. वैचारिक - हलक्याफुलक्या - कानपिचक्या मारणार्या कथा खूप काही सांगून जातात.. `पाठीवरचा देव,’ `मॉस्कोतील ती खोली!,’ `मन्याची पर्स,’ `पक्षितीर्थ,’ `कोडे’ आणि `गुंजन’ यासारख्या अजून १० कथांच्या आत्मानुभवांना कथारूप देताना लेखकाने त्यातील वाचनीयतेची लय उत्तम साधलेली आहे. प्रत्येक कथा वेगळा अनुभव देणारी आहे. काही कथा सुन्न आणि अंतर्मुख करणार्या आहेत. कथेतली दु:खं कधीतरी आपण अनुभवलेली वाटतात; तर काही कथांतील आनंदाचे, सुखाचे क्षण ओळखीचे असतात. लेखकाचे व्यापक अनुभवविश्व आणि सूक्ष्म निरीक्षणातून टिपलेल्या मानवी जीवनातल्या वेगवेगळ्या छटा या कथांतून व्यक्त झाल्या आहेत. तशा या संग्रहातील सर्वच कथा प्रवाही आणि वाचनीय आहेत आणि माणूस वेगळा असला तरी भावनाप्रधान असतो.. याची जाणीव या कथा आपल्याला आतपर्यंत करून देतात.