’चिकनसूप फॉर द मदर्स सोल’ या पहिल्या पुस्तकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आणि वाचकांच्या मागणीनुसार या दुसर्या भागाची निर्मिती करावी लागली.मातेची ममता, आईचं प्रेम हे या जीवसृष्टीतील चिरंतन मूल्य आहे. आईच्या ममतेची आणि आईची तुलना अगदी कशाशीच, कोणाशीच होऊ शकत नाही, अशा आशयाची एक आफ्रिकन म्हण आहे.या भागातील कथा मातेचं प्रेम, धैर्य, तिच्यातील शहाणपण यांवर प्रकाश टाकतात. काही कथांतून मातांचंही उद्बोधन केलं आहे. आईच्या प्रेमातील विलक्षण ताकद मुलाच्या येऊ घातलेल्या मृत्यूवरही मात करते - मग ते पोटचे मूल असो वा दत्तक घेतलेलं - हे वाचून आपण थक्क होतो. आईची आयुष्यातील भूमिका इतकी महत्त्वाची की ती नवी आयुष्यं घडवत असते. म्हणूनच मुलांच्या जडणघडणीमध्ये मुलांवर केवळ पैसा नाही, तर मुलांसाठी तुमचा वेळ देणं महत्त्वाचं आहे. तुमच्या मुलांना तुम्ही सर्वांत मोठी वंशपरंपरा कोणती देता, तर आनंदी आठवणी. आई-मुलांमधील भावबंधाची जाणीव मुलांना तेव्हा होते, जेव्हा तुम्ही तुमची मुलं वाढविता, हे जीवनातील एक लहान पण अत्यंत महत्त्वाचं तत्त्व छोट्या-छोट्या कथांमधून वाचकांपर्यंत पोहोचते, तर मातृत्वाची जबाबदारी ही मुलाच्या लंचबॉक्समधूनही कशी दिसते, त्याबद्दलच्या हृद्य कथाही यात आहेत. आईच्या प्रेमाची पक्व अवस्था आजी झाल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून आजी-आजोबांच्या ममतेचं महत्त्वही या कथांमधून अधोरेखित होतं. एकूणच मानवी जीवनातील आईच्या प्रेमाचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे जाणून आईचे प्रेम, ममता हे मूल्य जाणून घ्यायची शिकवण या कथांमधून नक्कीच मिळते आणि याची वाचनीयता त्यामध्येच आहे.
.