हे जग सोडून गेल्यानंतरही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणारे, ती सुरक्षित आहेत हे त्यांना सांगणारे वडील या पुस्तकात भेटतात. आपल्या नातीला आगीपासून वाचविणारे आजोबा जसे इथे आहेत, तसेच आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलीला आपली खूप आठवण येते, म्हणून सिनेमा बघताना तिच्या शेजारच्या खुर्चीत आपण आहोत असा विश्वास तिला देणारे वडीलही इथे दिसतात. गमतीदार वडिलांचे नमुने तर काही विचारूच नका. नुकत्याच जन्मलेल्या बाळाबरोबरची पहिली रात्र निव्वळ वैताग देणारीच. पण त्यातूनही हसत हसत वेळ निभावून नेणं केवळ अपत्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या वडिलांनाच जमू शकतं. खरंच, वडील - बाबा - पपा - डॅडी ही मंडळी म्हणजे जादूगारच असतात. अल्लाउद्दीनच्या दिव्यातल्या राक्षसासारखी जादू करणारी! ते त्यांच्याकडची जादूची कांडी अशी काही फिरवतात की, सगळे प्रश्न चुटकीसरशी होतात छू मंतर! ‘चिकन सूप फॉर द सोल इंडियन फादर्स’ हे पुस्तक हेच तर सांगतं ना!