साईबाबा कोण होते? ते कुठून आले? त्यांचा संदेश कोणता? त्यांना साक्षात परमेश्वर मानून असंख्य लोक त्यांची जी पूजा करू लागले, ती का आणि कशी? त्यांचे शिष्य तरी कोण? आणि हे शिष्य त्यांच्याकडे कशामुळे आकर्षित झाले? देशभर पसरलेल्या त्यांच्या लक्षावधी भक्तांना त्यांच्या लीलांविषयी नक्की काय वाटते? समाधीपूर्वी आणि समाधीनंतरसुद्धा आपल्या भक्तांच्या संकटकाळात बाबांनी त्यांना जो दिलासा दिला व जो करुणेचा वर्षाव त्यांच्यावर केला त्याविषयी त्यांच्या भक्तांच्या काय भावना आहेत? त्या चालत्या-बोलत्या ईश्वराविषयी आपल्या मनात उभ्या राहणाNया अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या चरित्राद्वारे आपल्याला मिळतात. जीवनातील सर्व स्तरांमधील असंख्य लोकांची मने त्या महात्म्याने काबीज केली आणि त्यांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. त्यांच्या भक्तांमध्ये गरीब होते, तसेच श्रीमंतही होते. विद्वान जसे होते; तसेच अशिक्षित, अडाणीसुद्धा होते. शिरडीच्या साईबाबांविषयी आजवर अनेकांनी अनेक पुस्तके लिहिली. पण त्या सर्वांपेक्षा हे पुस्तक निराळे आहे. साईबाबांच्या जीवनकालखंडाचे अत्यंत सुसूत्र, सुसंगत आणि वस्तुनिष्ठ वर्णन अशा प्रकारे प्रथमच लिहिले गेले आहे. तेही अत्यंत प्रवाही व प्रासादिक शैलीमध्ये. बाबांची तत्त्वे व त्यांचे जीवन याविषयीचे सर्व तपशील याचे अत्यंत नेटके रेखाटन यात आहे. शिरडीस आलेल्या एका माणसाची, एका ‘फकिरा’ची ही मनोवेधक कहाणी आहे. याला मुलांनी खोड्या काढून सतावलं, गावक-यांनी याची हेटाळणी केली. आणि त्याने पुढे त्रिकालाबाधित महात्मा होऊन सा-या आध्यात्मिक जगतावर अधिराज्य गाजवलं. या भूतलावर चालणारा तो साक्षात परमात्मा झाला. हे पुस्तक प्रत्येक साईभक्ताला संग्रही ठेवावेसे वाटेल. बाबांनी केलेल्या उपदेशाचे हे जणू बायबलच आहे. देशातील कोट्यवधी लोकांच्या घरांमधील देवघरे ज्या महात्म्याच्या तसबिरींनी सुशोभित झाली आहेत, त्या महात्म्याचे हे पुण्यस्मरण आहे.