'क्रांतिसूर्य : महात्मा बसवेश्वर' या पुस्तकामध्ये महात्मा बसवेश्वर यांचे जीवन, कार्य, वचने आणि विचारप्रणाली यांच्याविषयी संक्षिप्त पण सखोल माहिती दिली आहे.
महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात कर्नाटकात लिंगायत विचार प्रसृत करण्यासाठी 'शरण आंदोलन' छेडले होते.
बसवेश्वर कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी इ.स. १९४०मध्ये सुरू केलेली 'अनुभव मंटप' ही लोकशाहीची तत्त्वे पाळणारी धर्म-संसद उभारली होती.
बसवेश्वरांनी समाजातील उच्च-नीचतेवर आणि विषमतेवर प्रखर हल्ले चढवून समाजाला समतेचा प्रभावी मंत्र दिला.
लिंगायत धर्मीय प्रत्येक व्यक्तीने उदरनिर्वाहासाठी एखादा उद्योग-काम म्हणजे 'कायक' केलेच पाहिजे. 'कायक वे कैलास' म्हणजे 'श्रम हाच स्वर्ग,' हा मंत्र बसवेश्वरांनी सर्व अनुयायांना दिला.
बसवेश्वरांनी 'स्त्री शिक्षणाची व्यवस्था केली. त्यानंतर विणकर, मोळी-विक्या, शेतमजूर अशा स्त्रियांनी शरण-वचने लिहिली.
महायोगी अल्लप्रभू, सिद्धरामेश्वर, चन्नबसवेश्वर, अक्कमहादेवी, हरळय्या, मधुवारस, मडिवाळ माचय्या, महादेव, मारय्या, कक्कय्या, बोमय्या, शांतरस, रामण्णा, दसरय्या, नागीदेव कांबळे, रेमव्वा, शिवप्रिया, सत्यवती, पद्मावती, दानम्मा, संकव्वे, मुक्तायक्का, लिंगम्मा, लक्कम्या, नागलांबिका, गंगांबिका, नीलांबिका अशा अनेक स्त्री-पुरुष सहकाऱ्यांच्या कार्याचा परिचय दिला आहे.
लेखकाविषयी माहिती :
प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांनी एमए आणि ‘प्राचीन मराठीतील शिवदैवत-दर्शन’ याविषयात पीएचडी केली आहे. आजरा महाविद्यालय, आजरा, कोल्हापूर येथे प्रपाठक व माजी मराठी विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी पदवीसाठी ३४ वर्षे, पदव्युत्तरसाठी २५ वर्षे अध्यपनाचे कार्य केले आहे. ‘ऋग्वेद’ मासिक, ‘शिवरामकृत शिवकथामृत’ काव्यग्रंथ, ‘कर्णहंस’ काव्यग्रंथ यांसह अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ‘बसव पुरस्कार’, ‘मराठी काव्यातील शिवदैवत-दर्शन’ राज्यस्तरीय विशेषग्रंथ पुरस्कार, ‘शिवशाहू मंच’ ट्रस्ट कोल्हापूरतर्फे मानपत्र प्रदान, ‘आजराभूषण’ पुरस्कार, ‘ऋग्वेद’ दिवाळी अंकास उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार, ‘शिक्षणतपस्वी : जे. पी. नाईक’ पुस्तकास उत्कृष्ट चरित्राचे प्रथम पारितोषिक, वीरशैव मराठी साहित्यक्षेत्रात विशेष योगदानाबद्दल काशीपीठातर्फे डॉ. चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.