स्थळ, काळ आणि देश-भाषांच्या सीमा ओलांडून मार्गदर्शक
विचार सर्वव्यापी आणि शाश्वत असतात. आपल्या जीवनाला दिशा
देण्यात या मौलिक सुविचारांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. काय
करावे आणि काय करू नये अशी गोंधळाची स्थिती जेव्हा निर्माण होते
तेव्हा महान व्यक्तीच आपणाला दिशा दाखवतात. त्यापैकी स्वामी
विवेकानंद होत.
स्वामीजींना सामान्य माणसांविषयी अत्यंत तळमळ होती.
सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या
केंद्रस्थानी होता. तरुणांना ते संदेश देतात, “माझ्या तरुण मित्रांनो,
शक्तिशाली व्हा,’ ठाम निश्चयाचे, तेजस्वी असे शंभर युवक जग
हादरवून टाकू शकतात.
कारण जेव्हा एखादा विचार आपले मन, आपली बुद्धी इतकेच
नव्हे तर देहातील कणन्कण भारून टाकतो तेव्हा यशाला त्या
व्यक्तीकडे येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. जगण्याला आणि
जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत.
निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणि
दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती
आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात.
जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊन
सर्वांना प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची
मोलाची मदत होईल.