प्रेमाच्या अमर्याद शक्तीची, गहनतेची, अध्यात्मिकतेची विविध लोभस रुपे हजारो वर्षांपूर्वी बाऊल नावाची एक जमात होती. जमात हा जातीवाचक शब्द वापरणंही योग्य नाही. तो एक मेळावा होता. बाऊल हा शब्द मूळ संस्कृत ‘वातुल’या शब्दावरून आला. प्रेम, प्रेम आणि प्रेम हा ह्या मेळाव्याचा स्थायीभाव होता. ही माणसं सतत हसत, खेळत, बागडत होती. द्वेष, मत्सर, हेवा, स्पर्धा हे शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हते. स्वत:चं शरीर हे मंदिर आणि आत वास्तव्याला असलेलं चैतन्य हा त्यांचा देव. साहजिकच त्यांची कुठेही प्रार्थनामंडळं नव्हती. निसर्ग, झाडं, झरे, नद्या यातच त्यांचा परमेश्वर. त्यामुळे त्यांना शत्रूही नव्हते. ते कधी कधी अचानक रडायचे. कुणी कारण विचारलं, तर ते सांगत, ‘हे असीम आकाश, अमर्याद समुद्र, पर्वतशिखरांची रांग त्या शक्तीनं निर्माण केली. आणि हे सगळं बघण्यासाठी आम्हाला जन्म देऊन पंचेंद्रिये बहाल केली. ह्या देणगीचा भार असह्य होऊन आम्ही रडतो’. आज फक्त प्रेम वगळलं, तर बाकीच्या षड्रिपुंवर राज्य चाललं आहे. ओशो यांच्या ‘बिलव्हेड’ या ग्रंथाच्या आधारे केलेलं हे स्वैर लेखन आहे. ज्या लेखनाने मी भारावलो, ते वाचकांपर्यंत पोहोचावं हा हेतू.