प्रत्येक नव्या अनुभवाचं नातं - अंगावर काटा किंवा रोमांच उठवणाऱ्या केवळ एका क्षणाशी असतं. दुसऱ्याच क्षणी तो अनुभव जुना झालेला असतो. तो क्षण आनंदाचा असो की दु:खाचा. प्रत्येक क्षणाचा, अनुभवाचा रंगही अलग आणि अनुभूतीही अलग. वेदनेच्या स्पर्शानं व्यक्तीनुरूप मनाच्या सप्तरंगाचं दर्शन घडतं. कधी वेदनेतून अत्युच्च मन:सामथ्र्याचं इंद्रधनुष्य झळाळतं, तर कधी निराशेच्या काळ्या रंगाचं साम्राज्य पसरतं. ज्या क्षणी हा वेदनेचा स्पर्श होतो, त्या क्षणातच बिजलीप्रमाणे मनाचे हे रंग झळाळून उठतात. या मनाच्या विविध रंगछटांचं दर्शन वपुंच्या या पुस्तकातून घडतं. यातल्या प्रत्येक कथेतला वेदनेचा अंत:स्त्रोत वाचकांना वेढून टाकतो. या वेदनेसह जगणाऱ्या मनस्वी व्यक्तींच्या मनस्वी कथा अंतर्मुख करणाऱ्या .... स्वत:लाच शोधायला लावणाऱ्या ....