व.पु. काळे हे महाराष्ट्राला एक कथालेखक आणि कथाकथनकार म्हणून सुपरिचित आहेत. व.पु.ंचे वडील पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचं रूढ अर्थाने चरित्र म्हणता येईल अशा पद्धतीने वपुंनी चरित्र लिहिलं नसलं तरी वडिलांना केंद्रस्थानी ठेवून अंत:करणपूर्वक लिहिलेलं पुस्तक आहे, ’वपु सांगे वडिलांची कीर्ती.’ वपुंचे वडील उत्कृष्ट नेपथ्यकार होते. नाटक आणि चित्रपटांसाठी पडदे रंगवणं हे त्यांचं काम. वपुंची आई (वपु आणि त्यांची बहीण आईला ताई म्हणत), त्यांची मोठी बहीण सिंधूताई आणि वपु स्वत: असं हे चौकोनी कुटुंब. वपु आणि सिंधूताई वडिलांना ’अण्णा’ असं संबोधत. अण्णा मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरमध्ये नोकरी करत. मुंबईला मित्राच्या घरी ते राहत. कुटुंब मात्र पुण्याला होतं. महिन्या दोन महिन्यांनी दोन दिवस रजा घेऊन किंवा एखाद्या शनिवार-रविवारी ते पुण्याला येत. त्यावेळेला वपु आणि त्यांची बहीण शाळकरी वयात होते. नंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईच्या एका चाळीत घर घेतलं आणि वपु, सिंधूताई व ताई मुंबईला रवाना झाले. आता सगळं कुटुंब एका ठिकाणी राहू लागलं. वपु अणणांबद्दल सांगताना कधी वर्तमानात असतात, तर कधी भूतकाळात जातात; मात्र अण्णांच्या जीवनातील घटना-प्रसंगांचं वर्णन करण्यापेक्षा अण्णांची स्वभाववैशिष्ट्यं सांगण्याकडे त्यांचा कल दिसतो. नेपथ्याचं काम अण्णा किती तन्मयतेने आणि कुशलतेने करत याबद्दल ते सांगतात. तसेच एक वडील म्हणून त्यांचं आपल्याशी कसं नातं होतं, हेही सांगतात. मिश्किलपणा, काहीसा हळवेपणा, ओढठास्तीच्या आर्थिक परिस्थितीतही त्यांचं आनंदी राहणं, काटकसरीपणा, कष्टाळूपणा, वक्तशीरपणा, कधीही कोणाबद्दलही तक्रार करायची नाही किंवा केलीच तर ती वेगळ्या पद्धतीने करायची . त्यांची स्वभाववैशिष्ट्ये वपु नोंदवतात. अण्णा केवळ नेपथ्यकारच नव्हते तर ते लेखनही करायचे, मंगलाष्टकं रचायचे. वेगवेगळे अल्बम्स करायचा छंद त्यांना होता. वपुंच्या काही कथांची शीर्षकंही अण्णांनी सुचवली आहेत. ते रोजनिशी लिहित. त्यांच्या नेपथ्यातील बारकावे, जिवंतपणा आणि कुशलता दर्शवणारे काही प्रसंग वपुंनी सांगितले आहेत. ललितकलादर्शसाठी अण्णांनी केलेल्या कामाचा उल्लेख आणि त्यांचा त्या संस्थेशी असलेला ऋणानुबंध याबद्दलही वपुंनी लिहिले होते. राजकमल आणि ललितकलादर्श या दोन्ही संस्थांच्या यशस्वितेमध्ये अण्णांचंही योगदान महत्त्वाचं होतं; पण त्या संस्थांनी अण्णांची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही; उलट व्ही. शांताराम आणि भालचंद्र पेंढारकर यांनी अण्णांच्या बाबतीत जी अनास्था दाखवली त्याबाबतची नाराजी वपुंनी व्यक्त केली आहे.