सोना... वपुंच्या कादंबरीची कथानायिका. तिला प्रथम प्रश्न पडला होता की, आपण ठिकरी खेळणाऱ्या आहोत की स्वत:च ठिकरी आहोत हा संभ्रम जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत काय करायचं? नव्या अनोळखी चौकोनात जाऊन पडण्यापेक्षा परिचयाचा जुना चौकोन काय वाईट! तिची स्वत:ची जरी अधूनमधून तगमग होत असली तरी इतर ठिकऱ्यांना ती ऊब देऊ शकत होती. त्यांच्यापैकी कुणीतरी जेव्हा वाट्याला आलेला चौकोन सोडायचा प्रयत्न करेल, तेव्हा ती ठिकरी योग्य चौकोनात पडणार आहे की नाही, हे ती दक्षतेने पाहणार आहे.