कोणतंही पान उघडा आणि वाचा! ‘वपुर्झा’ हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी! हे पुस्तक कसं वाचायचं? एका बैठकीत? अथ ते इति? एका दमात? छे! मुळीच नाही. काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलावर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असतात. जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं विंÂवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं. हे पुस्तक असंच वाचायचं. हवं ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं. एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर? पुन्हा शोधायचा. त्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काहीही दिलेलं नाही.