छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला पुढे शाहू महाराजांच्या काळात पेशव्यांनी वैभवास नेले. आपला पराक्रम दाखवीत थेट अटकेपार मराठी झेंडे रोवण्याची कामगिरी पेशव्यांनी आपल्या सरदारांच्या मदतीने पार पाडली. पूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांची कामगिरी नावाजली जात होती, तसेच त्यांचा दरारा वाढला होता. तो इतका वाढला होता की, अखेरीस इथल्या हिंदी मुसलमानांनी दिल्लीची पातशाही वाचविण्यासाठी अब्दालीला, कंदाहारच्या बादशाहाला, पाचारण केले.
ज्या रुद्धाने मराठेशाहीचा इतिहास बदलला, त्या - मराठे विरुद्ध अब्दाली यांच्यातील - पानिपतच्या युद्धावर आधारित ही कादंबरी आहे. कोणत्याही युद्धाचा शेवट हा वाईटच असतो. युद्धाने अपरिमित हानी होते, पण सत्ता, संपत्ती यांचा लोभ ते घडवून आणण्यास कारण ठरतो. शिवाय आपणास माहिती आहे, बऱ्याचदा इतिहास हा जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो.
पानिपतच्या युद्धाच्या बाबतीतही असेच घडले. शाळेत आपण शिकलो ते मराठे युद्ध हरले. ‘दोन मोत्ये, सत्तावीस मोहरा गळाल्या, चिल्लर खुर्दा तर किती खर्ची पडला याची मोजदाद नाही’ हे आपण वाचले आहे; पण प्रत्यक्षात हे युद्ध का झाले? कसे झाले? यामागे काय कारणे होती? युद्धाच्या आधी आणि प्रत्यक्ष या वेळी काय काय घडले? डावपेच कसे लढवले गेले? इत्यादी गोष्टींचे वर्णन फारसे कधी वाचनात आले नाही, ते येथे येते.
युद्धात जिंकूनही मराठे हरले, ते कसे; याचे चित्रण या उत्कंठावर्धक कादंबरीतून नेटकेपणाने केले आहे.