जोखीम घेत, नव्या वाटा तयार करणारा आणि समाजाला एक घर पुढे नेणारा धडाडीचा माणूस म्हणजे उद्योजक! संकरित बीबियाणे उद्योगाची भारतात सुरुवात करणारे बारवाले असोत की करमणुकीलाच उद्योग मानून त्यात मनोभावे काम करणारे सुभाषचंद्र गोयल असोत. या पुस्तकातील चौदाही उद्योजकांनी आपले जीवन समृद्ध करण्यात आणि समाजाला पुढे नेण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे.
हजारो कोटींची उलाढाल आणि हजारोंना रोजगार देणाऱ्या या उद्योजकांची वाटचाल विलक्षण रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे. दीपस्तंभाप्रमाणे प्रकाश देणारी आहे. या प्रकाशात उमलत्या पिढीस उद्योजकतेची प्रेरणा मिळून, त्यांच्यातील सर्जनशीलता आणि कार्यकर्तृत्व चहुअंगाने फुलून आले, तर ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी हवेच आहे. उद्योजकीय विषयावर गेली अनेक वर्षे सातत्याने लिखाण करणारे ‘साकेत’चे एक सिद्धहस्त लेखक सुधीर सेवेकर यांचे हे पुस्तक म्हणूनच महत्त्वाचे आहे. अत्यंत नेमकेपणाने त्यांनी निवडलेल्या उद्योजकांची गुणवैशिष्ट्ये, कार्यकर्तृत्व आणि मर्म शब्दबद्ध केलेले आहे. युवावर्गासह सर्व स्तरातील, सर्व प्रकारच्या वाचकांना प्रस्तुत पुस्तक निश्चितच आवडेल. तसेच प्रगतीचा ध्यास घेतलेल्या प्रत्येक सक्रिय माणसाने हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे!