‘मोहरलेला चंद्र` — बाबाराव मुसळे यांचा हा कथासंग्रह. या संग्रहातील कथा वाचताना मुसळे यांच्या मनात फुलू लागलेला साहित्यिक मोहर स्पष्टपणे जाणवत जातो आणि हा मोहर कुठल्या साध्यासुध्या आंब्याचा नसून स्वत्वानं फुलून येणार्या नवतरुण ग्रामीण मनाचा आहे, याची खात्री होते. ग्रामीण जीवनात अनेक लहान-मोठे संघर्ष होत असतात. नवरा-बायकोतील रूसवे, तारुण्य बहरून आलेल्या विवाहित षोडशेच्या मनाचा कोंडमारा, अंधश्रद्धेमुळे निर्माण होणारा तणाव, जमीन हडपण्यासाठी पांघरलेले वेडेपण, आपल्याच समाजाविरुद्ध उभे राहिलेले कुटुंब, खेड्यातील राजकारण यांसारख्या विविध संघर्षाच्या ठिणग्या घेऊन मुसळ्यांनी आपल्या कथा फुलविल्या आहेत. या कथांतील व्यक्ती असहाय्य न होता संघर्षाविरुद्ध धडपड करीत असल्याने कथेत वेधकता आली आहे. ग्रामीण बोलीभाषेचा गंध असलेल्या या कथा वैदर्भीय मातीचा कस घेवून आकाराला येतात आणि तरूण साहित्यिक पिढीत जे नव्य उमेदीचे वैदर्भीय साहित्यिक आहेत; त्यात श्री. मुसळे यांचे महत्त्वाचे साहित्यिक स्थान आहे, हे पटवून देतात.