ओशो तेच सर्व सांगतात जे पूर्वापार कुणी ना कुणी सांगत आलेलं आहे आणि त्याही आधी कुणीतरी ते मांडलेलं आहे. मुळात जे मांडलं गेलेलं आहे ते अंगीकारता येणं निदान मला तरी शक्य नाही. कारण त्याचा अर्थबोध करून घेण्यासाठी तितकी साधना आणि अध्ययन हवं. सांसारिक मोहातून सुटका करून घेण्याइतपत मन शांत नाही. चंचल मनाला स्थिर करता आलं तर…
ओशो मदत करतात. ते प्रत्येकाच्या मनात असलेल्या ‘मुल्ला नसरुद्दीन’ला प्रत्येकाच्या समोर उभं करतात. आपण आपलंच वाचन करत आहोत, आपण आपल्याच आरशात बघतो आहोत… हे मी बघते, जाणते आणि नव्याने स्वतःला सामोरी जाते.
‘उपनिषद’ समजणं, त्याचं अध्ययन करणं मला कधीही शक्य नव्हतं; पण काही अंशी तरी ते शक्य व्हावं, असं कदाचित ओशोंनाच वाटलं असेल, म्हणून ओशोंचं ‘निर्वाण उपनिषद’ माझ्या मातृभाषेत भाषांतरित करण्याची संधी मला मिळाली.
‘निर्वाण’ बुद्धांचा शब्द… आणि निर्वाणचा योग्य, खरा अर्थ ओशोंनी इतक्या सहजपणे सोपा करून सांगितला आहे की, वाटावं किती सोपं आहे…… ‘निर्वाण!’ सोपं आहेही. ओशोच सांगतात तसं.
पण फक्त भाषांतर करून?
फक्त वाचून?
फक्त जतन करून?
आणि मनन करून?
या तर एक एक पायऱ्या आहेत. अजून वर जायचं आहे. मार्ग खडतर नाही; पण पल्ला मोठा आहे. मग समोरच निर्वाण आहे..!
माझा प्रवास सुरू आहे.