Your cart is empty now.
क्षत्रियांचा इतिहास' हा ग्रंथ आणखीही एका औचित्याने श्री. देशमुखसाहेबांनी क्रान्तिकारक पायावर नटविला आहे. तो विषय म्हटला म्हणजे सध्याची वर्णव्यवस्था हा होय. या विषयासंबंधाने आम्हास येथे विशेष कांही लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही, परंतु एवढे मात्र आम्ही स्पष्ट म्हणू की, वर्णप्रतिष्ठेचे ब जातिभेदाचे बंड केवळ रजिस्टर्ड जन्मजात हक्कावर अवलंबून ठेवण्याची प्रवृत्ती सुरू झाल्यामुळेच आर्याच्या गुणसंवर्धनक्रियेचा दरवाजा अजिबात बंद झाला. ज्या काळी आपापल्या अंगच्या विशिष्ट गुणप्रदर्शनाने योग्य वर्णाचे सर्टिफिकेट मिळविता येण्याचा वास्तव प्रघात सर्रास चालूहोता, त्या काळी सर्वांना आपापल्या पवित्र गुणांचे संवर्धन करण्यास एक प्रकारचे उत्तेजन दिल्याप्रमाणे होत होते, व राष्ट्रही त्या योगाने ज्ञानविज्ञानमय होण्यास बराच वाव श्रेष्ठपणाचा ठेका जेव्हा' बिचमें मेरा चांदभाई' या न्यायाप्रमाणे एका विशिष्ट वर्णाकडेच गेला, तेव्हा अर्थातच अहमन्यतेचा रजिस्टर्ड बडगा इतरे जनावर फिरू लागला, आणि समाजाची व्यवस्था खरजेने पीडलेल्या लुळ्यापांगळ्या कुत्र्याप्रमाणे कावरीबावरी झाली. आपापल्या अंगच्या गुणाचे संवर्धन करण्याविषयी लोक उदासीन होऊ लागले. धाव धाव धावले तरी आपली आता या जन्मजात वर्णव्यवस्थेच्या रामरगाड्यांत वर्दी लागणे शक्य नाही, ही भावना समाजघटकाच्या मनात उद्दीपित होऊन ते सद्गुणच्युत होण्याची स्वत:ला सवय लावून घेऊ लागले, नव्हे नव्हे, त्यांना या श्रेष्ठवर्णाची मिरास मिरविणाऱ्यांनी सद्गुणच्युत केले. 'दशिलोपि द्विजा. पूज्यो न शूद्रो जितेंद्रिय.', 'शक्तेनापि हि शूद्रेपण न कार्यो धनसंचय', अशी अनेक स्मृत्योक्त वचने कुवचने या आमच्या म्हणण्याची साक्ष अंशांनी एकांत एक बरोबर मिळतात आणि तसे ते मिळणे अगदी साहजिकच आहे. कारण हे किरकोळ जाती उपजातिसंज्ञक विभाग म्हणजे क्षत्रियरूपी नवनीताचे स्वार्थी लोकांच्या घुसळाघुसळीने झालेले लहान लहान कणच होत. तेव्हा ते भिन्नभिन्न रूप केव्हांही पावावयाचे नाहीतच ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे.
Added to cart successfully!