‘‘लोक मला अनेकदा विचारतात, ‘एवढ्या सगळ्या चित्रविचित्र गोष्टी नेमक्या तुमच्याच बाबतीत कशा काय घडतात?’ त्यावर त्या सर्वांना माझं एकच सांगणं असतं– जीवनाच्या या प्रवासात आपल्याला सर्वांनाच नानाविध माणसं भेटतात, कितीतरी अनुभवांना सामोरं जावं लागतं... त्यातले काही अनुभव आपल्याला स्पर्शून जातात, काही अंतर्बाह्य बदलूनसुद्धा टाकतात. तुमच्यापाशी जर संवेदनाक्षम मन असेल आणि तुम्ही या अनुभवांची नियमितपणे नोंद करून ठेवत असाल, तर तुमच्याही लक्षात येईल... तुमचं आयुष्य हासुद्धा एक विविध कथांचा खजिना आहे...’’ खेड्यापाड्यात जाऊन तेथील गोरगरिबांसाठी, झोपडपट्टीवासियांसाठी आणि सामान्य माणसांसाठी कार्य करत असताना सुधा मूर्ती, एक समाजसेविका, लेखिका आणि प्राध्यापिका– त्या सर्वांशी बोलतात, त्या लोकांचं म्हणणं त्या नोंदवून ठेवतात. या माणसांचा जीवनसंघर्ष, त्यांच्या आयुष्यात आलेले खडतर प्रसंग, त्यावर त्यांनी केलेली मात, कधीतरी त्या संकटांपुढे त्यांनी मानलेली हार... हे सगळं लेखिकेने आपल्या प्रवाही भाषेत या पुस्तकात मांडलं आहे. सर्वसामान्य माणसांच्या ठायी लेखिकेला दिसून आलेल्या असामान्य दातृत्वाच्या, नि:स्वार्थी वृत्तीच्या कथा यात आहेत. सुनामीसारख्या निसर्गाच्या प्रकोपाशी झुंज देणारी माणसं असोत, अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी उभ्या राहिलेल्या सबला असोत, स्पर्धेच्या युगात वरवर जाण्याची धडपड करणारे तरुण असोत– या सर्वांच्या गोष्टीतून मानवी स्वभाव आणि प्रवृत्तीच्या विविध पैलूंचं नेमकं चित्रण आपल्याला दिसतं. भारतीय समाजाचा आत्माच या पुस्तकाच्या रूपानं प्रतिबिंबित झाला आहे.