रणजित देसाई यांनी अगदी आरंभीच्या काळात ज्या काही लघुकथा लिहिल्या, त्यांतील निवडक कथा या संग्रहात संग्रहित केल्या आहेत. या कथा ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रसाद’, ‘किर्लोस्कर’, ‘अभिरुचि’ व ‘जनवाणी’ अशा दर्जेदार नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. या कथांविषयी लिहिताना स्वत: रणजित देसाई म्हणतात : ‘.... एक ‘गुजगोष्ट’ सांगावीशी वाटते, की मी जे काही लिहिले आहे, ते अगदी मनापासून लिहिले आहे. त्यात उणिवा असतील, दोष असतील, विस्तार कमीअधिक असेल, नागरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनाचेच जास्त चित्रण असेल; परंतु त्यात अप्रामाणिकपणा मात्र खास नाही. माझ्या कथांना कसोटी लावलीच, तर ती ‘प्रांजलपणा’चीच लावावी, एवढेच ‘पसायदान’ मी वाचकांपुढे मागतो.’