आधुनिक महाराष्ट्राच्या जीवनातला आणि इंग्रजी शिक्षणाबरोबर जी नवी स्री भारतात निर्माण होऊ लागली, तिच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा या कादंबरीत फार चांगल्या रीतीने प्रतिबिंबित झाला आहे. या दृष्टीने ही कादंबरी एका विशिष्ट कालखंडाची प्रतिनिधी आहे. तो काळ म्हणजे एकोणिसाव्या शतकाची अगदी शेवटची वर्षे आणि विसाव्या शतकाची पहिली दोन तीन दशके हा होय. या कालखंडात मध्यम वर्गातल्या सुशिक्षितांच्या आचारविचारात आणि भावभावनात झपाट्याने जे बदल होत गेले त्यांचे चित्रण करायला वामनराव जोश्यांइतका अधिकारी लेखक क्वचितच मिळाला असता. एक तर वामनराव या काळातच लहानाचे मोठे झाले होते. प्रत्येक चांगल्या कादंबरीत, बीजरूपाने का होईना, लेखकांचे आत्मचरित्र दृष्टीला पडते, असे काही टीकाकार म्हणतात. त्यांचे हे विधान एकांगी असले तरी अर्थपूर्ण आहे. वामनराव जोशी हे मराठीतले एक थोर कादंबरीकार आहे. वैचारिकता हाच त्यांच्या प्रतिभेचा विशेष होय. त्यामुळे साहजिकच निरनिराळ्या व्यक्ती आणि प्रसंग व त्यांच्या विविध पात्रांवर होणाऱ्या प्रतिक्रिया यांचे वर्णन करताना वामनराव स्वत:च्या उत्कट अनुभवांचा आश्रय घेतात. ‘नवा समाज’, ‘नवा मानव’, ‘नव्या श्रद्धा’, ‘नवी मूल्ये’ हे शब्द आज आपल्या भोवतालच्या वातावरणांत सारखे घुमत आहेत. अशा वेळी ‘सुशीलेचा देव’ ही विचारप्रेरक कादंबरी महाराष्ट्रांत घरोघर वाचली गेली पाहिजे. तिच्यातल्या ज्योतीवर आपल्या मनातल्या स्नेहपूर्ण वाती लावून घेतल्या पाहिजेत. तसे करताना भोवतालचा अंधकार उजळविण्याचा मार्ग त्यांना नि:संशय दिसू लागेल.