Your cart is empty now.
विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात या वर्षी तुर्की भाषेतल्या सात महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी.
तुर्की भाषेतील प्रतितयश ज्येष्ठ लेखक अहमत हमदी तानपिनार यांच्या मूळ ‘सतलेरी आयार्लामा इन्स्टिट्युत्सू’ या गाजलेल्या कादंबरीचा जयश्री हरि जोशी यांनी केलेला ‘तास वाजे झणाणा’ हा उत्कंठावर्धक मराठी अनुवाद वाचकाला विचारमग्न करतो.
आधुनिक काळाच्या गतीशी आणि पाश्चिमात्य जीवनपद्धतीशी जमवून न घेता आलेल्या सामान्य माणसाच्या हतबलतेबद्दल नर्मविनोदी भाष्य करत कथानायकाची व्यथा या कादंबरीतून तानपिनार यांनी मांडली आहे. माणसाच्या दुबळ्या आयुष्याबद्दल बोचरा उपहास व्यक्त करणारी या कादंबरीची शैलीही खुमासदार, रोचक आणि खोचक उपरोधाच्या अंगाने जाणारी आहे.
इस्लामी संस्कृतीचे अनोखे दर्शन घडवणाऱ्या भारतीय समाजाला पूर्ण अपरिचित असलेल्या या तुर्की कादंबरीतून संस्कृतीचे शेकडो संदर्भ सापडतात. तिथल्या समाजजीवनाचे, सामान्य माणसाचे प्रतिबिंब तानपिनार यांच्या या लोकप्रिय कादंबरीत पडलेले दिसते.
Added to cart successfully!