सध्याचे युग हे ज्ञानाचे युग आहे व जग हे एक वैश्विक
खेडे बनलेले आहे. या जगात स्थानिक स्तरापासून ते
आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ज्ञानाचे आदान-प्रदान करण्याची
प्रमुख भाषा आहे ‘इंग्रजी’. प्रगती व यशाच्या सुसंधींना
मुकायचे नसेल तर उत्तम इंग्रजी यायलाच हवे; परंतु
आपल्या सदोष शिक्षणपद्धतीमुळे व इंग्रजी संभाषणासाठी
योग्य ते वातावरण न मिळाल्याने बहुतांश मराठी भाषिकांना
इंग्रजी संभाषण म्हणजे एक यक्षप्रश्न वाटतो. या पुस्तकात
रोजच्या वापरातील इंग्रजी संभाषण शक्य तितक्या सुलभ
रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये व्याकरणाच्या
तांत्रिक बाबींमध्ये न अडकता सुटसुटीत व सोप्या
वाक्यरचनांवर अधिक भर दिला आहे. यात शाळा,
कॉलेजेस, ऑफिस, दवाखाना, हॉटेल्स, दुकान अशा
जवळजवळ सर्वच ठिकाणी उपयोगी पडणारे इंग्रजी
संभाषणाचे आदर्श नमुने आपल्याला बघायला मिळतील.
या पुस्तकाचे मनापासून अध्ययन करणाऱ्याला इंग्रजी
बोलण्याची भीती वा संकोच जाऊन इंग्रजी बोलण्याविषयी
नक्कीच आत्मविश्वास वाटू लागेल.
विद्यार्थी, व्यावसायिक व गृहिणी अशा सर्वांनाच अत्यंत
उपयुक्त ठरणारे व उत्तम इंग्रजी संभाषण करण्याचा
आत्मविश्वास देणारे पुस्तक !