Your cart is empty now.
एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. त्याबरोबर या बदलामुळे सामाजिक जीवनाला मात्र तडे गेले आहेत. या नव्या आव्हानांनी जागतिक व्यवस्थेचा ढाचा बदलला आहे.
या बदलाच्या पार्श्वभूमीवर डॉ. माणिकराव साळुंखे यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून शिक्षणव्यवस्थेचे वेगळे जग प्रस्तुत केले आहे. डॉ. साळुंखे यांनी पाच विद्यापीठांचे कुलगुरू पद भूषविले आहे. राज्याचे, केंद्राचे व स्वायत्त विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शिवाजी विद्यापीठात व राज्यस्थान केंद्रीय विद्यापीठात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांनी विविध विद्यापीठांमध्ये केलेल्या प्रयोगाचे व उभारलेल्या नवीन प्रकल्पाचे वर्णन या आत्मचरित्रात आहे. तसेच डॉ. साळुंखे यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाचे व तेथील शैक्षणिक प्रगतीचे सखोल वर्णन आहे.
कधी काळी शिक्षणक्षेत्र हे स्वतंत्र व आत्मनिर्भर होते, तसे ते आता राहिले नाही. अलीकडे विद्यापीठे राजकीय हस्तक्षेपाने गढुळली आहेत. या संदर्भात डॉ. साळुंखे यांनी शिक्षणाबद्दल मांडलेले विचार महत्त्वाचे आहेत. एका उत्तम संशोधक, तत्त्वनिष्ठ प्रशासक व शिक्षणचिंतकाचे हे आत्मचरित्र नव्या पिढीला व शिक्षण जगताला निश्चितच दिशादर्शक ठरेल.
पृथ्वीराज चव्हाण,
(माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
Added to cart successfully!