तुझ्या पुस्तकाची काही समीक्षणे माझ्या पाहण्यात आली होती. सर्वत्र अनुकूल अशीच प्रतिक्रिया होती. समाजात या विषयाबद्दल माहिती करून घेण्याची इच्छा वाढीला लागते आहे, हे चांगले लक्षण आहे. कामवासनेशी सदैव पापाचे नाते जुळवल्यामुळे या बाबतीत एकतर रोगट कुतूहल किंवा ढोंग या दोनच प्रवृत्ती वाढीस लागल्या. त्यात पुन्हा ‘ब्रह्मचर्य हेच जीवन’ सारख्या पुस्तकांनी प्रचंड गोंधळ घातला. जडीबुटीवाल्यांनीही लोकांमधले अज्ञान टिकून राहील आणि कामजीवन संपुष्टात येण्याची दहशत कायम राहील, याची खबरदारी घेतली. अशा या विषयावर लिहिण्याचे धाडस करणार्या र. धों कर्व्यांसारख्या माणसाला खूप छळ सोसावा लागला. त्यांनी स्वीकारलेल्या वैज्ञानिक दृष्टीचा पाठपुरावा करून सोप्या शब्दांत आणि बोलक्या शैलीत तू हा विषय समजावून दिला आहेस. अज्ञानामुळे कामजीवनाच्या बाबतीत निराश झालेल्यांना तुझ्या पुस्तकातून खूप धीर लाभेल, गैरसमज दूर होतील. अशा मार्गदर्शक पुस्तकाची गरज होती. तू ही जबाबदारी चांगल्या रितीनी पार पाडल्याबद्दल तुझे अभिनंदन.
तुझा,
पु. ल. देशपांडे