तंबी दुराईंच्या स्तंभाने विनोदशैलीचा एकच फॉर्म वापरलेला नाही. कधी निवेदन, कधी संवाद, कधी कविता, कधी अभंग, कधी कथा, कधी पत्रकारी बाज तर कधी समीक्षेचा ढांचा. इतके विविध फॉर्म्स हाताळणे हे केवळ लेखनकसब असून येत नाही, तर त्यासाठी त्या पद्धतीचे वाचन आणि व्यासंगही लागतो. परंतु तसे वाचन करतानाही एक तिरकी नजर लागतेच. अगदी संत साहित्याचे वाचन करतानाही ती तिरकी नजर तशीच सरळ (म्हणजे तिरकी, पण बुद्धिबळातला उंट तिरका चालतानाच सरळ चालतो तशी) ठेवावी लागते. ज्या व्यक्तींवर लिहायचे, त्यांचे फक्त विचार आणि राजकारण माहीत असून चालत नाही तर त्या व्यक्तीच्या लकबी, सवयी, शरीरयष्टी यांचेही नेमके ज्ञान असावे लागते. अनेकदा तंबी दुराईंना ती दृष्टी अंतर्ज्ञानाने प्राप्त झाली असावी असे वाटते. तंबी दुराई यांचा विनोद हा वाचकाला असा सजग करतो, आनंद देतादेताच आत्मपरीक्षण करायला लावतो आणि त्यातील निर्विषपणामुळे आल्हाददायक गुदगुल्याही करतो