शास्त्रीय संगीत ऐकायला खूप जणांना आवडते, पण अनेकांना त्यातले काही कळत नाही. त्यामुळे संगीताचा खरा आनंद घेता येत नाही. हे जाणून प्रसिद्ध शास्त्रीय संगीत व भावगीत गायिका सायली पानसे शेलिकेरी यांनी सकाळ सप्तरंग पुरवणीत 'गंधार' या नावाने सदर लेखनास सुरुवात केली. अल्पावधीतच हे सदर सर्वसामान्य संगीतप्रेमी आणि अभ्यासकांनाही आवडले. त्या सदराचे हे पुस्तकरूप. शास्त्रीय संगीताचा इतिहास, त्यामधील दिग्गज गायक, वादक यांची ओळख तर यामध्ये आहेच, त्याचबरोबर शास्त्रीय संगीताची मैफल म्हणजे काय, मैफलीचे घटक कोणते, सम म्हणजे काय, राग म्हणजे काय, आरोह- अवरोह, पलटे, ताना कशाला म्हणतात, या साऱ्या विषयांची माहितीही या पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत करून देण्यात आली आहे. संगीतातील घराणी, शब्दप्रधान गायकी अशा संकल्पनाही लेखिकेने स्पष्ट करून सांगितल्या आहेत. लोकप्रिय भावगीते कोणत्या रागांवर आधारित आहेत, याची माहितीही लेखिकेने दिली आहे. थोडक्यात, संगीतप्रेमींना शास्त्रीय संगीताशी निव्वळ ओळख नव्हे, मैत्री करण्यासाठी मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.