राधिका श्रीराम घोरपडे यांनी लिहिलेलं आणि प्रकाशित झालेलं हे पहिलं पुस्तक. राधिका घोरपडे या मूळच्या नायर कुटुंबातल्या. त्यांचे आई वडील उदरनिर्वाहासाठी पुण्यात आले. राधिका यांचा जन्मही पुण्यातला आणि पुढची सारी जडणघडणही पुण्यातली. त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक कडू गोड आठवणी या पुस्तकात लिहिल्या आहेत.
दोन विभिन्न संस्कृतीतील कुटुंबे विवाहाने जोडली जातात. रिती भाती खाण्यापिण्याच्या सवयी, पूजा अर्चा पद्धती बदलतात. त्यांची देवाणघेवाण होते. यातूनच संगीता नायर राधिका घोरपडे झाल्या आणि कोळिसऱ्याच्या लक्ष्मी केशवाची आराधना करू लागल्या
त्यांच्या बालपणापासून आजपर्यंत त्यांचे आई वडील, इतर नातेवाईक, सासर आणि माहेरची मंडळी, जवळचे सुहृद, त्यांचे विद्यार्थी या सगळ्यांच्या आठवणी आणि त्यांच्यासोबतचे ऋणानुबंध लेखिकेने अतिशय हळुवारपणे आणि आत्मीयतेने उलगडले आहेत.
लेखिकेविषयी : राधिका श्रीराम घोरपडे पुण्यात राहतात. तीन दशकांहून अधिक काळ त्या खासगी शिकवण्या घेत आहेत. त्यांना संगीताची आणि लिखाणाची विशेष आवड आहे. सहवासातील लोकांच्या वागणुकीचे, चालण्या बोलण्याचे निरीक्षण करण्याची त्यांना सवय आहे. यातूनच हे पुस्तक आकाराला आले आहे.