`माझा गाव` या माझ्या कादंबरीतील बरीच पात्रं आणि प्रसंग तर माझ्या घरचेच आहेत. कादंबरीतील वाडा हा अप्रत्यक्षपणे आमचाच आहे. जयवंताचं पात्र हे माझ्या प्रत्यक्षातील भावभावनांतून, अनुभवांतून आकाराला आलेलं आहे. इतर पात्रं मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. त्यांचे स्वभाव मी हेरलेले आहेत; त्यांची मांडणी मात्र नव्यानं केली आहे. तिथंच तेवढं कल्पनेचं साहाय्य घेतलं आहे. कादंबरीतील मुख्य पात्र आहे अप्पासाहेब इनामदार. हे पात्र मी वास्तवातूनच उचललं आहे. माझ्या वडिलांवरून ते सुचलं. पण कादंबरीतील त्या पात्राच्या जीवनात घडणाया घटना माझ्या वडिलांच्या जीवनातील मुळीच नाहीत. त्यांतील काही मी ऐकलेल्या आहेत. काही पाहिलेल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक जुनं गाव उभं करावं, असा एक हेतू या कादंबरीलेखनामागं होता. जुन्या ग्रामरचनेतील माणूस कसा होता, कसा जगत होता, स्वत:ला समाजाशी कसा वाहून घेत होता, हे दाखविण्यासाठी मी ही कादंबरी लिहिली आहे. आज सगळं ग्रामजीवनच बदलत चाललं आहे. समाज बदलतो आहे, संस्कारही बदलत आहेत; पण हरवलेल्या जीवनाची रुखरूख मात्र मनात घर करून होती. ती वाढतच होती. ती रुखरूख हीच या कादंबरीलेखनामागची मूळ प्रेरणा आहे...