शेकरा हा खारीच्या जातीचा विशेषत: जंगलात आढळणारा, झाडावर राहाणारा, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत मुक्तपणे फिरणारा व आवश्यकतेप्रमाणे जमिनीवर येणारा प्राणी. शेकरा खारीसारखाच दिसणारा, पण खारीहून कितीतरी मोठा, झुबकेदार शेपटी असलेला शाकाहारी प्राणी आहे. वेगवेगळ्या झाडांवरची फळे खात हिंडण्याबरोबरच जंगलातील वन्य पशुंचे जीवननाट्य तो बिटबिट्या, लालबुंद डोळ्यांनी दुरून पाहात असतो. या निरीक्षणात तटस्थता नसते. खूप उत्सुकता असते; जमेल तेथे सहभाग आणि पलायनही असते. शेकराच्या नजरेतून लेखकाने जंगलातले जीवन दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. शेकराला दिसलेला निसर्ग, ऋतुमानानुसार त्यामध्ये होणारे विविध बदल तसेच अनेक पशु-पक्ष्यांच्या स्वाभाविक प्रेरणा, त्यांचा जीवनसंघर्ष यामध्ये चित्रित केला आहे. यामध्ये शेकराच्या दैनंदिन जीवनाबरोबरच त्याने पाहिलेल्या इतर नानाविध प्राण्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचे हुबेहुब वर्णन आहे. शेकरा एका डोहाकाठी असलेल्या वडाच्या झाडावर बसून निसर्गाचे, तेथे पाणी पिण्यास येणार्या विविध पशु-पक्ष्यांचे निरीक्षण करतो. यामध्ये काळतोंड्या हुप्प्यांचं दात विचकून, भीती दाखवत अंगावर येणं, अस्वलाचं जमिनीवर पालापाचोळा हुंगत जाणं, मधमाश्यांच्या चाव्याची पर्वा न करता पोळं पाडून त्यातला मध पिणं आणि पिलांना मागे सारून वारुळात तोंड खुपसून अधाशासारखी एकट्यानेच वाळवी खाणं, वाघाची शिकारीला जाताना झाडाच्या सालीमध्ये नखांनी ओरबाडून ती साफ करण्याची सवय, मादी गव्याच्या प्रसूतीच्या वेळी खुद्द गवा आणि इतर माद्यांनी केलेले तिचे आणि वासराचे संरक्षण, सुसरीचं डोहाच्या काठावर येऊन ऊन अंगावर घेताना तोंडाचा आ वासून पक्ष्यांकडून दात साफ करून घेणं आणि डोहात शिरल्यावर किंचित डोके वर काढून पाणी पिण्यास आलेल्या भेकरास अलगद पाण्यात ओढून नेणं, प्रणयभंगास कारणीभूत ठरणार्या गजेंद्राच्या सोंडेला महाभुजंगाने घेतलेला चावा आणि त्यात झालेला दोघांचाही मृत्यू, नाग उंदराला खाण्याच्या पवित्र्यात तर झाडाच्या ढोलीतून बाहेर आलेले घुबड नागाला पकडण्याच्या तयारीत, भुकेलेल्या अजगराने सशाला लक्ष्य करणं; हे सारे प्रसंग अधूनमधून शेकराच्या डोळ्यांसमोर घडत असतात. दरम्यान, जंगलाला लागलेल्या आगीमध्ये सारे भस्मसात होते; साहजिकपणे बहुतेक सारे पशु-पक्षी हे जंगल सोडून आपल्या वाटेने दुसर्या जंगलात आश्रयास जातात. शेकरा मात्र या जागेने आजवर दिलेले सुख लक्षात घेऊन हे जंगल सोडून इतरत्र जात नाही; तर अशा प्रसंगातही तो बिळात असलेल्या सशाच्या दोन पिलांना कोवळे गवत देतो आणि त्यांच्याशी खेळतो तसेच तो सुतारपक्ष्याने चोचीने झाडामध्ये तयार केलेल्या पोकळीतील पिलांशी खेळण्याचा प्रयत्न करतो. अखेर एका दुर्दैवी क्षणी वाढत्या वयानुसार चपलताहीन झालेले शरीर आणि खचलेल्या मनाचा शेकरा पाणी पिण्यास येतो आणि बेसावधपणे खोकडाची शिकार होतो.