कै. रणजित देसाई यांच्या दैवी प्रतिभेचा हा प्रसन्न; परंतु अखेरचा ललिताविष्कार : स्नेहधारा ! दैव, व्यक्तित्व आणि परिस्थिती या तिन्हीच्या क्रियाप्रतिक्रियांमधून जीवन घडलं जात असताना ज्या ज्या छोट्यामोठ्या व्यक्तीशी त्यांचा ऋणानुबंध जडला, त्या सर्वांच कृतज्ञ स्मरण श्री. रणजित देसाई यांनी आपल्या या अखेरच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहात केलं आहे. हे सलग आत्मकथन नव्हे. काही तरी तात्कालिक निमित्त्त घडलं आणि त्या त्या व्यक्तीचं स्मरण उत्कटतेनं झालं. त्या व्यक्तीशी संबंधित प्रसंगांची आणि व्यक्तीचं हे हळुवार लेखणीनं केलेलं भावचित्रण आहे. या व्यक्तिरेखाही तशा समग्र, परिपूर्ण नाहीत. त्या व्यक्तीशी आलेला श्री. देसार्इंचा संबंध आणि त्या संबंधाची प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या मनावर उमटलेला चिरकालिक स्वरूपाचा संस्कार यांनाच या छोट्या स्मरणसाखळीत प्राधान्य दिलं गेलं आहे. कै. रणजित देसार्इंच्या वाचकांच्या हाती त्यांची ही अखेरची ललितकृती देताना आम्हांला दु:खमिश्रित आनंद होत आहे. दु:ख अशासाठी, की श्री. देसार्इंचं हे अखेरचं अप्रकाशित असं साहित्य आम्ही ग्रंथरूपानं प्रसिद्ध करीत आहोत...