खरेतर कुणाची खासगी पत्रे वाचू नयेत, असा संकेत आहे. पण तात्कालिकतेचे संदर्भ संपले की, पत्रे सार्वत्रिक होतात. पत्रांतून लिहिणार्यांच्या मनातील आनंद-दुःख, राग-लोभ आदी भावना- विचार प्रकटतात. तर काही पत्रे जीवनातील चिरंतन मूल्ये प्रकट करीत साहित्यरूप धारण करतात.
मराठी साहित्यात पन्नास वर्षांपूर्वी ‘विश्रब्ध शारदा’च्या तीन खंडांतून 1817 ते 1947 या एकशे तीस वर्षांतील 637 पत्रे प्रसिद्ध झाली. विश्रब्ध म्हणजे विश्वासाने सांगितलेल्या कथा.
पत्रव्यवहारात दोघांमधील विश्वासाचे हृद्गत असते. ती दोन मनांची संवादभूमी असते. व्यक्तिमनांचे धागेदोरे, पीळ आणि निरगाठी यांची वीण लक्षात घेऊन दि. के. बेडेकर पत्रव्यवहाराला विणकाम म्हणतात.
अशा एका दीर्घ परंपरेत बाबा आणि आशा भांड यांच्यातील एकोणपन्नास वर्षांपूर्वीच्या पत्रव्यवहाराचे तरल, संवेदनशील आणि हृदयस्पर्शी विणकाम ‘खडकपालवी’त येते. हे लेखन समृद्ध करते. संपन्न करते. ‘विश्रब्ध शारदा’त प्रेमविषयक पत्रे नव्हती. तो राहिलेला धागा यानिमित्ताने विणला गेला, हे महत्त्वाचे.