भारतीय समाज हा जातिप्रथेमुळे दुभंगलेला आणि कर्मकांड-अंधश्रद्धांमुळे गतिशून्य झालेला आहे, हे प्रज्ञावंत सयाजीराव गायकवाड यांनी सुरुवातीसच ओळखले होते. त्यासाठी धार्मिक, सामाजिक सुधारणांचे कायदे करून त्यांनी अस्पृश्योद्धाराचे काम हाती घेतले. 1882 साली अंत्यजांसाठी शाळा, वसतिगृहे सुरू केली. जातिभेद निर्मूलनाचे कायदे करून अंमलबजावणी केली.
जात स्थानिक द्वेष वाढविते, देशात दुही माजविते, बुद्धीची वाढ खुंटविते, राष्ट्रीय शक्तीचा र्हास घडविते. यावर मात करण्यासाठी सर्व जातीत रोटी-बेटी व्यवहार सुरू करावेत, असे वारंवार ते सांगत असत. जाती-धर्मातील पंक्तिभेद दूर करण्यासाठी स्वत:च्या राजवाड्यातून प्रारंभ केला. आपले राजवाड्याजवळचे खंडोबाचे मंदिर अस्पृश्यांना खुले केले.
सयाजीरावांनी पददलित अस्पृश्यांना शिक्षण देऊन इतरांसोबत आणण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. त्याच वेळी सर्वांच्या धर्मस्वातंत्र्याची पाठराखण करताना, सर्वधर्मसमभाव हेच त्यांच्या राजनीतीचे मुख्य सूत्र राहिले.
सर्व वंश, जाती, धर्मांच्या लोकांचा मिळून एक समतावादी समाज निर्माण व्हावा, असे सयाजीराव महाराजांचे स्वप्न होते, हे त्यांच्या या भाषणातून पदोपदी लक्षात येते.