सध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत. यामुळं मानसिक व्यथा आणि विकार उद्भवतातच; पण ज्यांना सायकोसोमॅटिक डिसीजीस् (Psycho-somatic Diseases) म्हणून संबोधलं जातं, असे शारीरिक विकारही यातून उद्भवतात.
मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होऊन उद्भवणारे विकार म्हणजे दमा, पेप्टिक अल्सर, मधुमेह, हृदयरोग, अतिसार, मलावरोध, अल्सरेटिव्ह कोलायटिस, अतिरक्तदाब, संधिवात, नाना प्रकारचे त्वचारोग, मासिक पाळीसंबंधी तक्रारी इत्यादी.
मानसिक तणावामुळं हे विकारवाढीला लागतात आणि मानसिक स्थिती सुधारल्यास हे आजार बरे होण्यास आत्यंतिक मदत होते. विकृत मन:स्थिती, मानसिक रोग व तदानुषंगिक शारीरिक विकार यावर डॉ. बाख यांनी प्रदीर्घ संशोधनाअंती सिद्ध केलेल्या पुष्पौषधींचा रामबाण इलाज होतो. केवळ शारीरिक तक्रारींसाठीही ही औषधं उपयोगात आणली जातात; परंतु त्यांची योजना मात्र त्या वेळेच्या विशिष्ट मानसिक लक्षणांवरूनच करण्यात येते.
पुष्पौषधी या नवीन उपचार-पद्धतीचं विस्तृत विवरण करणारं मराठीतील हे पहिलंच पुस्तक म्हणावं लागेल.