‘युगद्रष्टा महाराजा’ हे एका प्रयोगशील शेतकरी राजाच्या चरित्रावर आधारलेले, ऐतिहासिक दस्तऐवजांचा धांडोळा घेऊन संशोधक वृत्तीने लिहिलेले राजकीय महाकथन आहे.
ब्रिटिशांनी भारतीय राजेशाहीला मांडलिकत्वाच्या जोखडात अडकवून ठेवले असताना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी मात्र चातुर्याने क्रांतिकारी स्वातंत्र्यवीरांना आणि कर्त्या समाजसुधारकांना पाठबळ पुरविले; तसेच राजेशाहीचे लोकशाहीत रूपांतर करण्याचा धाडसी प्रयोग करून नवभारताच्या जडणघडणीचा पाया रचला. जनतेला मतदानाचा अधिकार, ग्रामपंचायतींची स्थापना, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा, वाचनालयांची स्थापना, अस्पृश्यता, वेठबिगारी, बालविवाह प्रतिबंधक कायदे, राज्यात समृद्धी आणण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, जमीनसुधारणा, आरोग्य सेवा, उद्योग-व्यवसायासाठी कौशल्य शिक्षण, कायद्याचे सामाजिकीकरण व पारदर्शी प्रशासनासाठी जनमाध्यमांचा प्रभावी वापर अशा अनेक मार्गांनी विधायक राजनीतीचा नमुनादर्श निर्माण केला.
नागरिकांमध्ये साहित्य व कलेची अभिरुची निर्माण करण्यासाठी आणि कलावंतांना राजाश्रय देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. यशस्वी राज्यकर्ता, कुशल प्रशासक आणि द्रष्ट्या विचारवंतांची सर्व गुणवैशिष्ट्ये महाराजांकडे होतीच; परंतु अस्तित्वाची कोंडी करणार्या घटना प्रसंगांवर मात करण्यासाठी लागणारी प्रबुद्धताही त्यांनी संपादित केली होती. त्यामुळे या चरित्रकथनाला प्लेटोच्या ‘द रिपब्लिक’, रामचंद्रपंत अमात्यांचे ‘आज्ञापत्र’ यासारख्या आधुनिक राज्योपनिषदाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.