* 'मी कमलेश कोठुरकर' या कादंबरीत लेखक शिवराज गोर्ले यांनी एका महत्त्वाकांक्षी युवकाचे आत्मकथन रेखाटले आहे.
* कादंबरीचा नायक कमलेशने 'माझा जन्म सामान्य म्हणून जगण्यासाठी झालेला नाही,' अशी नोंद आठवीत असताना आपल्या डायरीत केली होती. तो त्याचा जीवनप्रवास युवकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
* सबुरी, चिकाटी, आत्मविश्वास, लोकांना प्रभावित करण्याची क्षमता आणि भांडवलाचा पुरवठा ह्या यशस्वी उद्योजकासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी कादंबरीत चपखलपणे मांडल्या आहेत.
* 'पैसा, पॉवर, प्रतिष्ठा' या तीन गोष्टींना महत्त्व देऊन जगणारा कमलेश शेवटी प्रेम आणि इतर जीवन मूल्यांचे महत्त्व जाणतो, ते वाचकाला आपलेसे वाटतात.
* माहिती तंत्रज्ञान, मार्केटिंग, फायनान्स यांसारख्या संकल्पनांचे सध्या-सोप्या भाषेत कादंबरीच्या माध्यमातून केलेले विश्लेषण रंजक आहे.
* रंजक कथानक आणि व्यवस्थापन शास्त्र यांचा योग्य समन्वय या कादंबरीत साधला आहे. ही जमेची बाजू आहे.
* आपल्या मुलानेही ‘कमलेश कोठुरकर’ व्हावे असे वाटणारे पालक, मुले-मुली, तरुण-तरुणी आणि चाळिशीतल्या काही प्रौढांनाही ही कादंबरी आपलीशी वाटेल.
शिवराज गोर्ले यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) आणि एम.बी.ए.ची पदवी संपादन केली आहे. फिलिप्स इंडिया लि., किर्लोस्कर कन्सल्टंटस् लि. व स्टॅटफिल्ड इक्विपमेंट्स या उद्योगसंस्थांमध्ये पर्सोनेल व मार्केटिंग क्षेत्रात ते कार्यरत होते. ‘कुर्यात सदा टिंगलम’, ‘गोलमाल’ ‘बुलंद’, ‘अनैतिक’, ‘भांडा सौख्यभरे’ या नाटकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी ‘थरथराट’, ‘खतरनाक’, ‘धुमाकूळ’, ‘बंडलबाज’, ‘बाप रे बाप’, ‘बजरंगाची कमाल’, ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘सूडचक्र’, ‘चिमणी पाखरं’, या चित्रपटांसाठी पटकथा, संवादलेखन केले आहे. ‘घरकुल’ या दूरदर्शन मालिकेचे लेखन तसेच ‘दुरंगी’, ‘सर्वस्व’ या कादंबर्या, ‘नग आणि नमुने’, हा विनोदी व्यक्तिरेखासंग्रह, ‘मेख’, ‘फिट्टम् फाट’ हे विनोदी कथासंग्रहांचे लेखन केले आहे. ‘मजेत जगावं कसं?’ या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार, ‘नग आणि नमुने’ करीता विमादी पटवर्धन व राज्यशासनाचा पुरस्कार, ‘सुजाण पालक व्हावं कसं?’ करीता मराठी साहित्य परिषद आणि शिक्षण मंडळ, कर्हाड यांचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.