जीवनात परिवर्तन हवे असेल, तर आपल्या प्रत्येकामध्ये असणारा ‘कृष्ण’ आपल्याला जागवावा लागेल. धर्माचा, नीतिनियमांचा आणि सामाजिक विचारांचा सूक्ष्मार्थ लावीत कृष्णाने जटिल समस्या सोडविल्या होत्या. बलाढ्य कौरवांना अद्दल घडवून त्याने एका मोठ्या बदलाचा प्रारंभ केला. सुरुवातीस श्रीकृष्णाकडे ना सैन्य होतं ना कोणती सामग्री; पण तरीही कृष्ण कुठेच थांबला नाही. साहस, प्रचंड श्रम आणि उत्तम नेतृत्वगुणांसह कृष्ण पुढेच जात राहिला. श्रीकृष्णाचं हे कर्तृत्व व ते मिळविण्याची नीती म्हणजेच कृष्णनीती.
कृष्ण कोण होता? कृष्णाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, कृष्णाचे परिपूर्ण नेतृत्व, राजनीतिज्ञ कृष्ण, तत्त्वज्ञ कृष्ण, प्रेमाचा सिद्धांत, श्रीकृष्णाचे संपत्तीनिर्मितीबद्दलचे धोरण, पृथ्वीचे भविष्य अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रकरणांद्वारे डॉ. जाखोटिया श्रीकृष्ण जीवनदर्शन घडवितात. डॉ. गिरीश प. जाखोटिया यांना मराठी भाषेतून ललित लेखन करून राष्ट्रीय चेतना जागविल्याबद्दल पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘कृष्णनीती’ या पुस्तकासाठी चेतना पुरस्कार मिळाला आहे.
या पुस्तकात कृष्णाचे उलगडलेले नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व, त्याचे डावपेच, त्याची रणनीती, त्याचा प्रेमाचा सिद्धांत आपण सर्वांनीच आज आचरणात आणला तर आपली आणि आपल्या या भारत देशाची निश्चितच प्रगती होईल.
अर्थात २१ व्या शतकातही आपला ‘प्रिय कृष्ण’ आचरणीय आहे, गरज आहे ती फक्त त्याच्या नीतीकडे डोळसपणे पाहण्याची!