एकविसाव्या शतकामध्ये व्यवस्थापन आणि त्यासंबंधीची कौशल्ये विकसित करणे आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षणसंस्थाही विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापकीय आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कॉर्पोरेट क्षेत्र, कार्यालयेही उत्तम व्यवस्थापन करू शकणाऱ्या आणि सर्जनशील विचार करू शकणाऱ्या व्यक्तींच्या शोधात आहेत. रोजगार क्षेत्रही अशाच कुशल व्यक्तींची वाट पाहत असते. वाचकमित्रांनो, तुम्हालाही या संधी उपलब्ध आहेत. गरज आहे ती फक्त तुम्ही या संधींसाठी सक्षम होण्याची.
तुम्ही या संधीचे सोने करून तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि आनंदित करण्यास उत्सुक आहातच. तुमचे हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रस्तुत पुस्तक तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल.
या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकात लिहिलेल्या प्रत्येक लेखाचे एकविसाव्या शतकाशी फार जवळचे नाते आहे. सध्याच्या कार्यसंस्कृतीवर आणि कार्यानुभवावर हे लेख आधारित असल्यामुळे वाचकांना ते अधिक आपलेसे वाटतील. यामध्ये सांगितलेली व्यवस्थापनविषयक माहिती आणि कौशल्यांची गरज वाचक स्वत: आपल्या जीवनात अनुभवतील अशी खात्री आहे.